महाराष्ट्र

सरकारी भूखंडाचं काय घेऊन बसलात ? ; अलिबागचा उंदेरी किल्लाही विकला गेला होता…

> लेखन : एस. एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार

झी24 तासच्या माध्यमातून कमलेश सुतार आणि त्यांच्या टीमनं दिलेल्या एका बातमीनं 40 एकर सरकारी जमीन “दादा” राजकारण्याच्या घश्यात जाता जाता वाचली..
आम्हीही धनदांडग्यांच्या घश्यात जाणारा अरबी समुद्रातील उंदेरी किल्ला असाच वाचविला..
अत्यंत रोमहर्षक किस्सा आहे तो..

तेव्हा मी अलिबागला होतो..
एक दिवस सायंकाळी पाचच्या सुमारास माझा दिवंगत सहकारी जनार्दन पाटील याचा मला फोन आला..
“सर, उंदेरी किल्ला 2 कोटी रूपयांना विकला गेला आहे, त्याचा साठेकरार झाला आहे”
मी म्हटलं, “ए जनार्दन काहीही सांगू नकोस, महाराष्ट्रातील गड-किल्ले सरकारी मालकीचे आहेत, ते कोणाला, कसे विकता येतील” ?
तो म्हणतो, “सर सगळे कागदपत्रे घेऊन मी ऑफिसला येतोय..
जनार्दननं आणलेले कागदपत्रं पाहून मी चक्रावून गेलो..समोर कागद दिसत असून माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता..
असं कसं काय होऊ शकतं?
याचं उत्तर मला मिळत नव्हतं..
थोडा इतिहास चाळला..
उंदेरी किल्ला थळ गावापासून पश्चिमेला समुद्रात साधारण दीड-दोन नॉटिकल मैल अंतरावर आहे.. थळ येथीलच काही जणांची वहिवाटदार म्हणून सातबारावर नावं होती.. अलिकडच्या सहा वंशजांची नावं त्यावर होती.. पैकी दोघे मयत होते.. पण त्यांची नावं कायम होती…हे लोक आपण किल्ल्याचे मालक आहोत असं समजत होते..
गंमत म्हणजे ही प्रॉपर्टी बिनशेती करून घेतली गेली होती..
मुंबई येथील मे. डॉल्फिन स्टोनक्रेस्ट इस्टेट प्रा.लिमिटेड कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सातबारयावर नावं असलेले आणि कंपनी यांच्यात संगनमत होऊन हा किल्ला फक्त 2 कोटी रूपयांना विकण्याचा सौदा झाला.. गंमत म्हणजे याची कुणकुण जिल्हा प्रशासनाला लागली होती, अन त्यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांना लेखी पत्र पाठवून
“किल्ला विक्रीचे दस्तऐवज आले तर ते नोंदवून घेऊ नये” असे बजावले होते..
असं असताना देखील किल्ला विक्रीचा हा दस्त जानेवारी 2006 मध्ये नोंदविला गेला.. गंमत म्हणजे मयत दोघांच्या नावावर भलत्याच दोघांना उभं करून ते हेच आहेत असं दाखवून दस्त नोंदविले गेले..
म्हणजे सारंच बनावट..
कोणी रमेश हिरानंद कुंदनमल यांनी 25 जानेवारी 2006 रोजी मुद्रांक काढले होते.. आजच्या सारखं 500 रूपयांच्या मुद्रांक शुल्कावर तेव्हा भागलं नव्हतं.. तेव्हा 12 लाख रूपये मुद्रांक शुल्क भरावे लागले होते..तेव्हा च. य. हरगुडे नावाचे दुय्यम निबंधक होते..
महाराजांनी शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी अलिबागच्या समुद्रात कुलाबा, खांदेरी आणि उंदेरी असे तीन जलदुर्ग बांधले होते.. हे सरकारी मालकीचे किल्ले असताना उंदेरी किल्ला विकला गेला होता..
दुपारी साडेचार वाजता किल्ल्याची रजिस्ट्री झाली अन पाच वाजता जनार्दन पाटील यांच्या हाती कागदपत्रं पडली..
दुसरया दिवशी कृषीवलच्या माध्यमातून ही बातमी आम्ही दिली तेव्हा रायगडात भूकंप झाला..
असं कसं काय होऊ शकतं हा सवाल जो तो विचारत होता..
पण सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर या देशात काहीही होऊ शकतं याचं प्रत्यंतर आम्हाला तेव्हा आणि आजही येतंय.. सतत पंधरा दिवस आम्ही हा विषय लावून धरला.. डी. एस. झगडे हे तेव्हा रायगडचे कलेक्टर होते.. नारायण राणे महसूल मंत्री होती.. त्यांनी चौकशी समिती नेमली त्यात दुय्यम निबंधक च. य. हरगुडे आणि अन्य काही जणांना निलंबित करण्यात आलं..
पुण्यातील भूखंड घोटाळयासारखंच विक्री करार रद्द करण्यात आला.. परंतू ज्यांनी हा किल्ला विकला आणि ज्या धनदांडग्यांनी तो खरेदी केला त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही..
हे विशेष..
म्हणजे पुण्यातील महार वतन विक्री प्रकरण देखील याच मार्गानं जाणार असं दिसतंय..
प्रकरण राज्यभर गाजत राहिलं..
मुंबईच्या वर्तमानपत्रांनी ही स्टोरी लावली..
टाइम्स ऑफ इंडियानं जनार्दन पाटील यांची सविस्तर मुलाखत घेतली..
एकीकडं आमचं कौतूक होत होतं
दुसरीकडं आम्ही काहींच्या डोळ्यावर आलो होतो..
एक दिवस माझ्या घरी दोन शस्त्रधारी पोलीस आले..
“आम्हाला आपल्या संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आल्याचं” त्यांनी सांगितलं..
जनार्दन पाटील यांनाही सरकारनं अंगरक्षक दिले होते.. एस. पी. कडे चौकशी केली
“तेव्हा तुमच्या जिविताला धोका असल्याने सरकारच्यावतीनं हे अंगरक्षक दोघांनाही दिले आहेत” असं सांगितलं गेलं..
एक महिनाभर हे अंगरक्षक आमच्याबरोबर होते.. प्रकरण एवढ्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं, पण काहींचे आर्थिक हितसंबंध दुखावले होते आणि मे. डॉल्फिन स्टोनक्रेस्ट प्रा. लिमिटेड या कंपनीचे उंदेरी किल्ल्यात पंचतारांकित हॉटेल उभं करण्याचं स्वप्न भंग पावलं होतं..

 

 

 

 

 

 

 

आमच्यावर हे सारे खूष तर होणार नव्हतेच..
आम्ही घाबरलो नव्हतो..
जे होईल त्याला तोंड देण्याची माझी तयारी होती..
महाराजांचा किल्ला धनदांडगयांच्या घश्यात जाण्यापासून वाचविला याचं अत्यंतिक समाधान आम्हाला.. यापुढं कशयाची पर्वा नव्हती..
किल्ला विक्री प्रकरण काढणारया जनार्दन पाटील याची आज आठवण येते..
हाडाचा पत्रकार होता तो ..
कमालीचा न्यूज सेन्स आणि मोठा जनसंपर्क असल्यानं त्यानं अनेकांना अंगावर घेणारया बातम्या दिल्या.. तीन – चार वर्षापुर्वी तो आम्हाला सोडून गेला..
फार वाईट वाटलं..
पत्रकारांना अनेकजण कायम शिव्यांची लाखोली वहात असतात..पण माध्यमं आहेत म्हणून तरी धनदांडगे आणि दादा राजकारणी ठिकाणावर आहेत..
उंदेरी किल्ला विक्रीचं प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं तर आज उंदेरीवर पंचतारांकित हॉटेल दिसलं असतं आणि कमलेश सुतार यांनी पुण्यातील जमिन घोटाळा काढला नसता तर ही सरकारी जमीन
पार्थ पवार यांनी वाटलीच होती..
उंदेरी किल्ला विक्री प्रकरणात जश्या घटना घडत गेल्या तश्याच घटना आज पुण्यातील सरकारी जमीन विक्री प्रकरणात घडत असलयानं हे सारं आठवलं..
आपल्या देशात काहीही म्हणजे काहीही होऊ शकतं, त्यामुळंच केवळ माध्यमांनीच नव्हे तर जनतेनं ही डोळ्यात तेल घालून पहारा दिला पाहिजे..
अन्यथा मोकाट सुटलेला बदनाश राजकारणी
भूखंड, नद्या, गड-किल्ले, डोंगर,गिळंकृत करायला टपून बसलेले आहेतच..

*एस.एम.देशमुख

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button