महाराष्ट्र

स्वराज्याचा कणा… गुप्तहेर “बहिर्जी नाईक”

माहिती मदत : सतीश कदम

४०० वर्षांनंतरही शिवरायांच्या कार्यकर्र्तृत्वाचा अंदाज बांधणे कठीण आहे. साहस आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी अनेक युद्धमोहिमांमध्ये विजय संपादन केला. यामागे शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा कारणीभूत ठरली. दुर्दैवाने शत्रूंनी रायगड किल्ला उद्ध्वस्त केल्याने शिवरायांच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे अनेक पुरावे नष्ट झाले. त्यातच त्यांची गुप्तहेर यंत्रणा एवढी वेशांतर करून फिरत होती की काहीवेळेला महाराजांशिवाय इतरांना समजतही नव्हते की आपल्यासोबत फिरणारा आपला एक सहकारी गुप्तहेर म्हणून बातम्या पोहोचवितो आहे.

कुठल्याही लष्करात गुप्तहेरयंत्रणा जेवढी सक्षम असेल तेवढे विजयाचे गणित आणखी सोपे होत जाते. शिवकालखंडात गुप्तहेर हा तर लष्कराचा कणाच होता. लष्करातील प्रत्येक सरदाराबरोबर १० जासूद असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावे वापरण्यात आली होती. त्या एकप्रकारे गुप्तहेराच्या सांकेतिक संज्ञा म्हणता येतील. त्यानुसार त्यांना कासीर, जासूद, हरकारा, राऊत, सांडणीस्वार, प्यादा, जिलीब, ढालाईत, फडवाईक, कागदी दूत, खिदमतगार असे सूचक शब्द वापरत असत. मध्ययुगीन कालखंडात गुप्तहेराचे जाळे प्रत्येक राजाबरोबर असायचे. त्यानुसार मोगल दरबारात वाकनविस, सवाहनिगार, खुफियानिवास, हरकारा याप्रमाणे गुप्त वार्ताहर होते. परंतु स्वराज्याच्या गुप्तहेरांची सर त्यांना कधी आली नाही.

जगातील जातीव्यवस्था ही लष्करामुळेच कमी होण्यास मदत झाली. महाराजांनी तर समाजातील सर्वच उपेक्षितांना आपल्या लष्करात सामावून घेतले होते. त्यामुळे आजचे गोंधळी, पिंगळी, कुडबुडे जोशी, जरीमरी, कडक लक्ष्मीवाले, बहुरूपी यांच्यासारख्यांना यात सामिल करून घेतले. विविध रूपे घेऊन ही मंडळी शत्रूच्या गोटात घुसून माहिती बाहेर काढत असत. यातूनच करपल्लवी भाषेचा उगम झाला. तानाजी मालुसरे सिंहगड घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने गोंधळ्याचे रूप घेतलेले होते. तर अफझलखानाची माहिती काढण्याकरिता नानाजी प्रभू मुसेखुरेकर हे कडक लक्ष्मीच्या वेशात वाईत फिरत होते. तर शाहिस्तेखानाच्या वेळी केवळ गुप्तहेरांमुळेच एवढी धाडसी कामगिरी पार पाडता आली.

अलीकडील काळात झालेल्या संशोधनानुसार बहिर्जी नाईक हा शिवरायांच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख असून तो बहुधा रामोशी समाजाचा असावा. एकेदिवशी आपली कलाकारी दाखवत असता रत्नपारखी शिवरायांनी त्याच्यातील गुण हेरून त्याला गुप्तहेरांचे प्रमुख बनविले. नावाप्रमाणे हे खातेही अतिशय गुप्तच असल्याने स्वराज्याच्या या यंत्रणेविषयी विशेष माहिती मिळू शकत नाही. बहिर्जीचा पूर्वेतिहास उपलब्ध होत नाही. परंतु तो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत महाराजांच्या सेवेत कार्यरत असावा असे दिसते. कुठलीही मोहीम आखण्यापूर्वी बहिर्जीची पथकं संबंधित ठिकाणाची माहिती घेत असत आणि मगच पुढील बेत आखण्यात येई. फकिर, बैरागी, दरवेशी, भिकारी अशा नानाविध वेशात बहिर्जीची पथकं काम करत होती. फक्त मराठ्यांचे गुप्तहेर काम करत होते असे नाही तर शत्रूची पथकेही सर्वत्र फिरत असत. शाहिस्तेखानाचे २०० गुप्तहेर स्वराज्याच्या विविध भागात फिरत असताना बहिर्जीच्या गुप्तहेरांनी त्यांचा कधी काटा काढला हे खानाला समजलेसुद्धा नाही. त्यांच्या भरवशावर तो गाफील राहिला.

महाराजांची खरी कसोटी तर आग्राभेटीत दिसून येते. एखाद्या मगरीच्या जबड्यातून स्वत:ची सुटका करून घ्यावी अशी अवस्था राजांची होती. परंतु याही ठिकाणी बहिर्जीने आपल्या कलेची बाजी लावून फकिराच्या वेशात थेट बादशहा औरंगजेबाच्या दरबारात जाऊन बातम्या काढण्याची कामगिरी पार पाडली. बहिर्जीने काढलेल्या मार्गावरूनच राजे स्वराज्यात परत आले. बहिर्जी एवढ्यावरच थांबला नाही तर शिवाजी महाराज हे आग््रयाच्या कैदेतून निसटले हे धाडसच होते. परंतु या वेळी उत्तर भारतात अशा अफवा पसरल्या की, शिवाजीला काळी जादू येते त्यामुळे ते अदृश्य होतात. किल्ल्याच्या तटावरून उडी मारू शकतात, हवेत उडू शकतात, कुठलेही रूप घेऊ शकतात. आश्चर्य म्हणजे इंग्रजांचा एक डॉक्टर थेवेनो हा या वेळी आग््रयातच असून त्याने आपल्या डायरीत हे सर्व लिहून ठेवलेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व अफवा पसरविण्याचे काम स्वत: बहिर्जीने पार पाडले होते.

सुरतेवर महाराजांनी दोन वेळा स्वा-या केल्या. स्वारीच्या अगोदर बहिर्जीने २०० गुप्तहेर सुरतेमध्ये पेरून ठेवलेले होते. फकीर, बैरागी, व्यापा-याच्या वेशात जागोजागी जाऊन बहिर्जीने मालदार व्यापा-यांच्या घरांची खडान् खडा माहिती घेतली होती. इंग्रजांच्या वखारीबाहेर तर महिनोन्महिने बहिर्जी भिका-याच्या वेशात बसून भीक मागत माहिती काढत होता. त्यामुळेच जेव्हा महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले तेव्हा मराठ्यांनी व्यापा-याच्या घरातून अगणित संपत्ती हस्तगत केली. जमिनीत

पुरलेले हे धन मराठी फौजेला कसे काय माहीत झाले? म्हणत पुन्हा एकदा महाराजांच्या दैवीयोगाच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु ही सर्व करामत बहिर्जीच्या कामगिरीचीच होती. हाजी बेग, बहिर्जी बोहरा यांच्या घरातून बहिर्जीने अगणित संपत्ती बाहेर काढली हे पाहून ते पण चकित झाले की आपल्या बापजाद्यांनी ठेवलेल्या संपत्तीचा आपल्यालाही पत्ता कसा लागला नाही.

महाराजांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम म्हणजे जालना स्वारी असून १६७९ साली काढलेल्या या स्वारीत महाराजांना फार मोठी हानी पोहोचली. औरंगाबादहून आलेली मोगलांची फौज त्यांच्या पाठलागावर असल्याने जीवन-मरणाच्या प्रसंग उद्भवला. तीन-चार हजार सैन्य मारले गेले. तेव्हा प्रसंग ओळखून बहिर्जीने वेगळ्याच वाटेने महाराजांना सुखरूपपणे रायगडावर पोहोचते केले. इतर कामगिरीच्या मानाने ही कामगिरी स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.

शिवरायांच्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत किती तरी लढाया झाल्या. अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली; परंतु तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडेप्रमाणेइतरांना प्रसिद्धी मिळाली नाही. त्याप्रमाणे शिवरायांच्या गुप्तहेर खात्यामध्ये ३ ते ४ हजार गुप्तहेर असून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध होताना दिसत नाही. नशीब म्हणजे या खात्याचा प्रमुख बहिर्जीविषयी काही प्रमाणात माहिती उपलब्ध झालेली आहे. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या कामगिरीवर कुणी प्रकाश टाकलेला नाही. नाही म्हटले तरी भालजी पेंढारकरांनी १९४३ साली ‘बहिर्जी नाईक’ नावाचा सिनेमा काढून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरकारने कुंभारकिन्ही धरणाला बहिर्जी नाईक धरण नाव देऊन काही प्रमाणात न्याय दिला आहे. माणूस मोठा झाला की त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याप्रमाणे बहिर्जीला आपल्या बिरादरीत ओढण्याचा प्रयत्न झाला.

ब-याच इतिहासकारांनी बहिर्जीला रामोशी, बेरड जातीत घातले तर मराठ्यांचा इतिहासकार ग्रँट डफ त्यांना रामोशी मांग म्हणतो. आपल्या दृष्टीने त्याची जात नाही तर कामगिरी महत्त्वाची वाटते. भर दरबारात प्रवेश केल्यानंतर शिवरायांशिवाय इतरांना बहिर्जी कधी ओळखायलासुद्धा यायचा नाही. असे म्हटले जाते की बहिर्जीच्या कमरेला असणा-या सोन्याच्या बेलपत्राच्या खुणेवरून महाराजही त्याला ओळखत. ही खूण मात्र फक्त दोघांनाच माहीत असावी. त्यामुळे बहिर्जी कसा होता हे शेवटपर्यंत कुणालाच समजले नसले तरी एकदा इंग्रजांना मात्र ते उमजले. महाराजांनी सुरतेवर स्वारी केल्यानंतर त्यांच्यावर एका दूताने भेटण्याच्या बहाण्याने हल्ला केल्यामुळे मराठ्यांनी अवघ्या चार तासांत सुरतेची बेसूरत करून टाकली. तेव्हा आपणाला अभयदान मिळावे म्हणून इंग्रजांचा वकील हेन्री ऑस्झिंडेन हा राजांना भेटण्यासाठी आला तेव्हा त्याची नजर महाराजांशेजारी उभा असणा-या माणसावर स्थिर व्हायला लागली.

मनात विचारांचे काहूर माजले. हा माणुस कोण? असा एका मराठा सरदाराला जवळ बोलावून हळूच विचारले, बाबा रे, हा माणूस कोण आणि इथे काय करतो आहे? त्याला सांगण्यात आले की ‘हा महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख बहिर्जी नाईक आहे.’ त्याच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकायला सुरुवात झाली. त्याच गोंधळलेल्या मनःस्थितीत तो उच्चारला, मागच्या महिन्यापासून हा माणूस आमच्या वखारीपुढे भिकारी म्हणून भीक मागत होता. स्वत:चे डोके बडवत त्याने स्वत:लाच सावरले आणि म्हटले, हा भिकारी नाही.. बहिर्जी आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही तर इंग्लंडला पाठविलेल्या पत्रातही त्याने बहिर्जीचा उल्लेख केला आहे. बहिर्जीच्या कामगिरीची ती पावती आहे.

मुक्काम पोस्ट बाणूरगड (ता. खानापूर, जि. सांगली) या ठिकाणी या जिगरबाज मावळ्याची समाधी आहे. समाधीकडे पाहिले की वाटते, बहिर्जी इथं कसं आलात? कारण हेपण इतिहासाला अजून माहीत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button