पिंपरी चिंचवडसमाजकारण

सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची काळाची गरज” – डॉ. नंदकिशोर एकबोटे

टाळगाव चिखली येथे विराट हिंदू संमेलन

टाळगाव चिखली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


चिखली I झुंज न्यूज : कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास संशोधक आशिषजी भरतवंशी यांनी इतिहासातील प्रेरणादायी घटनांचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध हिंदूवादी वक्ते डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचे वचन “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” याचा उल्लेख करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच परिवर्तनामागील हेतू शुद्ध आणि पवित्र आहे , म्हणून त्याला निश्चित यश मिळते. हे वचन व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला दिशा देणारे अत्यंत प्रभावी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आपल्या प्रभावी भाषणात सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, अत्यंत कठीण परिस्थितीत—उंच डोंगरांवर, प्रतिकूल हवामानात—भारतीय सैनिक देशाचे रक्षण करत असतात. “सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि अशा कार्यक्रमांचे आयोजनही शक्य होते,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “पंच परिवर्तन” संकल्पनेचा उल्लेख करत, सध्याच्या काळात देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही भूमिका अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. भारताची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी सैनिकांच्या शौर्यकथा पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हाव्यात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे ‘पसायदान’ राष्ट्रपती भवनात स्थापित व्हावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. या विचारांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच सैनिकांच्या पराक्रमाच्या कथा समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे सांगून कुटुंब आणि समाजप्रबोधनासाठी विविध उपक्रमांची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ तत्त्वज्ञान सांगून एकता निर्माण होत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून समाज घडतो, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी स्वतःला घडविल्याशिवाय समाज घडत नाही, हा संदेश दिला.


डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी वारकरी संप्रदायाचे उदाहरण देत मंदिर हे समाजजीवनाचे केंद्र असल्याचे सांगितले. पर्यावरण, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले. भगवद्गीतेतील “यदा यदा हि धर्मस्य…” या वचनाचा संदर्भ देत ‘भारत’ ही संकल्पना व्यापक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाशी निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी गोवंशांना राष्ट्रीय दर्जा द्यावा, त्यामुळे गोवंश हत्येचा कायदा अधिक प्रभावी होईल, असे आवाहन करण्यात आले. याच वेळी त्यांनी संत गुलाबराव महाराज यांच्या अद्वितीय ज्ञानसाधनेचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी आशीर्वचन देत उपस्थितांना आध्यात्मिक संदेश दिला. यावेळी हिंदुत्ववादी आमदार पै. महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात भव्य मिरवणूक, विविध सांस्कृतिक उपक्रम, महिलांचे रामरक्षा पठण आणि धार्मिक सादरीकरणांनी वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या भव्य संमेलनामुळे टाळगाव चिखली परिसरात सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. शेवटी सर्व उपस्थितांनी वंदे मातरम राष्ट्रीय गीताने व “भारत माता की जय” या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button