वाकडच्या राजकारणात नवा अध्याय ! ; ‘स्वप्निल बनसोडे’ यांच्या उमेदवारीची घोषणा…
> संजय कलाटें यांच्याकडून पहिली उमेदवारी जाहीर करत स्थानिक राजकारणात आघाडी
पुणे : वाकडच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक दशकांपासून दबदबा असलेले आणि स्थानिक राजकारण एकहाती फिरवणारे नेते संजयदादा कलाटे यांनी प्रभाग क्रमांक २५ (वाकड-ताथवडे-पुनावळे) मधून एससी प्रवर्गातून स्वप्निल भगीरथ बनसोडे यांच्या उमेदवारीस प्रथम प्राधान्य जाहीर केले आहे. या घोषणेनं निवडणुकीचे बिगुल वाजले असून, वाकडच्या राजकारणात नव्या उमेदवाराच्या प्रवेशाने खळबळ उडाली आहे.
संजय कलाटे यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाला असून, इतर पक्षांच्या अंतर्गत कलहामुळे अनेक इच्छुक उमेदवार आपले स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करत आहेत. संजय कलाटे यांनी वाकडमध्ये पहिली उमेदवारी जाहीर करून स्थानिक राजकारणात आघाडी घेतली आहे.
स्वप्निल बनसोडे मागील एक दशकापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. ते विशेषतः कष्टकरी युवक, कामगार, रिक्षाचालक, छोटे व्यावसायिक, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सोसायटी धारक यांच्यात लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्यामुळे या वर्गांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. बनसोडे यांनी जनसंपर्कात आघाडी घेतली असून, इतर उमेदवार राजकीय अनिश्चिततेमुळे जनसंपर्कात मागे पडत आहेत. उमेदवारीची शाश्वती नसल्यामुळे ते संभ्रमात असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, वाकडच्या राजकारणात प्रथमच एखाद्या नेत्याने आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करून एक नवीन आदर्श घालून दिला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक २५ मध्ये नव्या नेतृत्वाने प्रचारात आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. संजय कलाटे यांच्या नेतृत्वाखाली वाकडचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता स्वप्नील बनसोडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे वळण येण्याची शक्यता आहे. प्रभागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षीय पॅनेलमध्ये स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे. काही उमेदवार पक्षांतर्गत कलहामुळे मागे पडत असून, जनसंपर्क कमी करत आहेत. दुसरीकडे स्वप्नील बनसोडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यात वेग घेतला आहे.
या निवडणुकीत वाकड-ताथवडे-पुनावळे प्रभागातील मुद्दे केंद्रस्थानी असतील. पाणीपुरवठा, रस्ते विकास, शिक्षण आणि रोजगार हे प्रमुख प्रश्न आहेत. कलाटे यांच्या पाठिंब्यामुळे बनसोडे यांना निश्चितच फायदा होणार आहे. मात्र, इतर पक्षांकडूनही उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. एकंदरीत, ही उमेदवारी वाकडच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते. निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




