आपल्या वाघनख्यांसारख्या तिक्ष्ण लेखणीने भटभिक्षुकशाहीचा थरकाप उडवणारे सत्यशोधक “प्रबोधनकार’ ठाकरे”
लेखन : बाळासाहेब कदम

लेखन : बाळासाहेब कदम
१७ सप्टेंबर १८८५ रोजी केशव सिताराम ठाकरे यांचा जन्म पनवेल येथे झाला तर मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यांना एकूण ८८ वर्षाचे आयुष्य लाभले. ‘प्रबोधन’ या त्यांनी चालवलेल्या नियतकालिकनेच त्यांना ‘प्रबोधनकार’ ही ओळख दिली. प्रबोधन या साप्ताहिकातून त्यांनी भटशाही व विषमता यावर जोरदार प्रहार केला. सबंध आयुष्य त्यांनी लेखन, वाचन, प्रबोधन यासाठीच खर्च केले. “प्रबोधनकार ठाकरे” ही त्यांची ओळख यथार्थ आहे. प्रबोधनकारां वरती महात्मा फुले यांच्या विचार कार्याचा प्रभाव होता. प्रबोधनकारांनी अत्यंत परखड भाषेत आपली मते मांडली आहेत. हिंदू धर्माच्या ऱ्हासाला कोणती व्यवस्था कारणीभूत आहे. जातवाद, अस्पृश्यता, पुरोहितशाही धर्माच्या व देवळाच्या नावावर होणारे अत्याचार, शोषण याची चिकित्सा त्यांनी अत्यंत तर्ककठोरपणे व जहाल शब्दात केली आहे. प्रबोधनकारांचं साहित्य प्रचंड आहे. जवळजवळ त्यांच्या साहित्याचे पाच खंड प्रकाशित झालेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी दिलेला लढा हा कधीही न विसरता येण्याजोगा आहे. शिवसेनेच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. ‘शिवसेना’ हे नाव त्यांचेच तसेच ‘जय महाराष्ट्र’ हा नाराही त्यांचाच.

महात्मा फुले यांची ‘सत्यशोधकी विचारधारा’ पुढे नेणारे आक्रमक सत्यशोधक, भटशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, तथाकथित इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंसारख्या जातनिष्ठ इतिहासलेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, विद्रोही वक्ते, सामाजिक सुधारणांचा प्रचार प्रसार करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेतेही, भटपुरोहितांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मक्तेदारीला भिक न घालता सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे, रयत शिक्षण संस्था यासारख्या अवघ्या महाराष्ट्राला सज्ञान करण्याचा ध्यास घेतलेल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतारवयात तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे.

‘प्रबोधनकार’ ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. या सत्यशोधक विचारप्रणालीच्या प्रसारासाठीच त्यांनी ‘प्रबोधन’ हे नियतकालिक अनेक वर्षे प्रकाशित आणि संपादित केले. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे ‘प्रबोधन’ त्या काळात खूपच गाजले आणि त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना प्राप्त झाली. वृत्तपत्रातील कर्तबगारी ज्यांच्या नावाशी कायमची निगडित झाली आहे असे जे थोडे पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे. लोकहितवादींनी सूचित आणि ज्योतीराव फुल्यांनी प्रवर्तित केलेली सत्यशोधक चळवळ ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाची क्रांतीकारक घटना.
त्यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज असे म्हणतात की, “समाज जीवनाच्या सर्व स्तरावर समतेची आणि न्यायाची स्थापना करू पाहणारी अशी सर्वस्पर्शी आणि व्यापक चळवळ भारतात अन्यत्र कोठेच झाल्याची दिसत नाही. फुल्यांच्या समोर एक जात नव्हती. एक उद्दिष्ट होते ते सामाजिक न्यायाचे. म्हणून त्यांनी दलितांच्या दास्याला विरोध केला तसा ब्राम्हण विधवांच्या केशवपनालाही केला. शिक्षणाचा प्रकाश मागासवर्गापर्यंत महिलांपर्यंत पोहचवला आणि अनौरस अपत्यांनाही आधार दिला. विवाहविधीत मराठी मंत्र आणण्याचा आणि पुरोहित कार्य ब्राम्हणेतरांकडून करून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दारिद्र्याच्या गर्तेत बुडालेला शेतकरी आणि जनावरी जीवन जगणारा कामगार यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले. समाजातील व्यवस्थेचे समग्र परिवर्तन आणि संपूर्ण शुद्धीकरण हे उद्दीष्ट फुल्यांसमोर होते. त्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची आचार विचार संहिता त्यांनी तयार केली आणि तिच्या स्थापनेसाठी अजिंक्य रणशिलतेने विरोधी शक्तींशी कडवी झुंजही दिली. त्यांनी आंदोलन उभे केले, पण त्याच्या प्रसाराला त्या काळच्याच मर्यादा होत्या. या चळवळीचा संदेश त्यांच्या हयातीत महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचला नव्हता. पुणे शहर ही त्या काळात महाराष्ट्राची वैचारिक आणि सांस्कृतिक राजधानी होती. रेलगाडीच्या डब्यांना गती, दिशा आणि नियंत्रण देणाऱ्या इंजिनासारखे पुण्याचे स्थान होते. फुले पुण्यातलेच आणि त्यांचे विरोधकही पुण्यातलेच. तेथील सनातनी आणि समेटवादी शक्तींशी मुकाबला करण्यातच फुल्यांना आपली हयात खर्ची घालावी लागली. गंगेचा अवतार गंगोत्रीत झाला, पण त्याखालील माळमैदानावर तिचे अवतरण झाले नाही.

हे कार्य फुल्यांच्या निधनानंतर दोन दशकांनी झाले. १८९० मध्ये फुले दिवंगत झाले. मधल्या काळात क्षीण झालेल्या या आंदोलनाला चेतना आणि गती देण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी स्वीकारली. त्यांना साथ देऊन अथवा स्वतंत्रपणाने, ज्या विचारवंतानी, कार्यकर्त्यांनी, पत्रपंडितांनी या विचारप्रणालीचा धूमधडाक्याने महाराष्ट्रात प्रसार केला त्यात प्रबोधनकारांची गणना प्रामुख्याने होते. शाहू महाराज आपल्या संघटना कौशल्याने आणि आर्थिक मदतीने या चळवळीला पुढे नेत होते, तर प्रबोधनकार आपल्या लेखनाने आणि वक्तृत्वाने. समाजपरिवर्तनाचा ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तित्व अत्यंत मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते. प्रारंभीच्या काळात त्यांना दारिद्र्याचे दशावतार बघावे लागले. अनेक आघात सहन करावे लागले. संसारात पाय रोवून स्थिर होण्यासाठी परस्परांशी संबंध नसलेले अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले. विविध व्यवसायांतील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. चित्रकला, नाट्य, टंकलेखन, छायाचित्रण अशा अनेक क्षेत्रात त्यांची प्रतिभा सहजतेने संचार करीत होती. पण सर्व करीत असता त्यांचे मार्गक्रमण चालू होते ते त्या ‘एकच तारा’च्या दिशेने. तो तारा होता, समाज परिवर्तनाचा, अन्याय निवारणाचा. लोकहितवादींच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर प्रथमपासून होता. पुढील काळातील त्यांचे वाचन तर अफाटच होते. कधीही न सुटलेले आपले व्यसन म्हणजे ‘बूकबाजी’चे असे त्यांनी सांगितले आहे. फुले, आगरकर, रानडे त्यांनी पचवले. त्याप्रमाणे इंगजीतील शेक्सपियरसारख्या अनेक अभिजीत नाटककारांचा आणि वैचारिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. पण ‘सत्यशोधक’ मताकडे ते वळले ते पुस्तकांच्या वाचनांमुळे नव्हे, तर जीवनात आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे. स्वाभिमान जखमी करणारे प्रसंग त्यांनी अनुभवले आणि स्त्रियांवर, दलितांवर होणारे घृणास्पद अन्यायही त्यांनी पाहिले.
लहानपणापासूनच त्यांचे मन या बाबतीत अतिशय संवेदनशील होते, हळवे होते आणि लढाऊही होते. एका जरठबाला विवाहाच्या निषेधार्थ लग्नमंडप जाळून टाकण्याचे साहस त्यांनी कुमारवयातच केले होते. त्यांची ही लढाऊ न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानी वृत्ती अखेरपर्यंत अबाधित राहिली.
आर्थिक विवंचना असतानाही त्यांनी आपली लेखणी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही. शाहू महाराजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते, पण महाराजांनी अकारण केवळ मेहेरबानी म्हणून देऊ केलेली पाच हजारांची रक्कम (त्या काळात एका इस्टेटीसारखी) चार कडक शब्दांसह त्यांनी तिथल्या तिथे परत केली. या वृत्तीमुळेच त्यांनी सत्यशोधक विचारांचा ध्वज खांद्यावर घेतला आणि त्याच्या प्रचारासाठी ‘प्रबोधन’ पत्र सुरू केले. त्याची लेखन-भाषण शैली त्यांच्या वृत्तीशी मिळती जुळती म्हणजे तिखट, प्रहारशील आणि ग्रामीण आविर्भावाची होती. तात्त्विक विवेचनापेक्षा शाब्दिक आसूड उडविण्याकडे अधिक कल असलेली. या शैलीमुळे सामान्य जनतेपर्यंत ते सहजतेने पोहचू शकले. शाहू महाराजांच्या प्रेरणेने सर्वत्र संचार करणारे सत्यशोधक जलसे आणि प्रबोधनकारांसारख्या काही लेखकांचे आक्रमक लेखन, यामुळे शहरापुरता मर्यादित असलेला सत्यशोधक विचार महाराष्ट्रातील, निदान काही भागात तरी बहुजन समाजापर्यंत पोहचला आणि बंडखोरीची हवा सर्वत्र धगधगू लागली. पण हे सर्व काही काळच टिकले. पेटविण्याच्या भरात तात्विक पाया सुरक्षित ठेवण्याकडे वा अधिक भक्कम करण्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे सत्यशोधक विचारप्रणालीतील एक एक कलम बाद होत गेले आणि त्या सर्वस्पर्शी चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झाले. ते ही पर्व संपले आणि ब्राह्मणेतर चळवळीचे काँग्रेसच्या अधिक व्यापक अशा राष्ट्रीय आंदोलनात विसर्जन झाले. हे विसर्जन ऐतिहासिकदृष्ट्या आवश्यक आणि अपरिहार्य होते. तरी पण हेही खरे की सामाजिक क्रांतीच्या आणि शुद्धीकरणाच्या दिशेने जाणारा एक आशादायक प्रवाह खंडित झाला. केवळ खंडित झाला नाही तर शेवाळून गेला. परिणामतः दोन पावले पुढे गेलेली सामाजिक मानसिकता आता चार पावले मागे सरकली आहे. नागरिक शील बांधण्याचा प्रयत्न मागे पडला असून जातीय संघर्ष, अंधश्रद्धा, सहिष्णूता, भ्रष्टाचार, गुंडानुयय, नीतिहीन सत्तालालसा अशा अनिष्टांना ऊत आला आहे. संकुचित निष्ठांच्या उद्रेकांनी आकाश अंधारल्यासारखे झाले आहे. आता देश पुन्हा प्रतीक्षेत आहे नव्या सत्यशोधक आंदोलनाच्या. या प्रतीक्षेला प्रबोधनकारांच्या सत्यशोधक विचारांचा आधार मिळावा.”

वक्तृत्वशास्त्र, लाईफ अँड मिशन ऑफ रामदास, भारत इतिहास संशोधन मडंळाला उलट सलामी म्हणजे कोदण्डाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, नोकरशाहीचे बंड अर्थात ग्रामण्याचा साद्यंत इतिहास, दगलबाज शिवाजी, शनिमहात्म्य, धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म, हिंदू धर्माचे दिव्य, हिंदू धर्माचा ऱ्हास आणि अधःपात, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई सरस्वती, श्री संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अल्पचरित्र, माझी जीवनगाथा, स्वाध्याय संदेश, उठ मऱ्हाठ्या उठ हे ग्रंथ तसेच खरा ब्राम्हण, टाकलेलं पोर, संगीत विधिनिषेध, काळाचा काळ, संगीत सीताशुद्धी ही नाटके अशा प्रकारचे विपुल विविधांगी लेखन आणि अनेक चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. याशिवाय त्यांनी श्यामची आई, महात्मा फुले, माझी लक्ष्मी या आचार्य अत्रे यांच्या चित्रपटांत अभिनयही अभिनयही केला.
२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. तेव्हा त्यांनीच स्थापन केलेला राजकीय पक्ष म्हणजे शिवसेनेच्या हातात मुंबईची सत्तेवर होती. त्यांची निघालेली अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा होती. घराच्या उंबरठ्याबाहेर सतत असणारा चपलांचा ढीग हीच आपली खरीखुरी संपत्ती असे संस्कार आपल्या मुलांना देणारे प्रबोधनकार आपलं तुफानी ८८ वर्षांचं एक सर्वार्थाने सिद्ध, समृद्ध आयुष्य जगले. उत्तरायुष्यात त्यांनी सामाजिक कार्यायुष्याची समाधानाने रजा घेतली होती.
प्रबोधनकार यांच्या ‘सत्यशोधक’ स्मृतीस विनम्र भावपूर्ण अभिवादन…!!



