पुणेकलामनोरंजनमहाराष्ट्र
मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला पुन्हा संधी
दणदणीत विजयातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनलचे वर्चस्व सिद्ध

पुणे I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, या निवडणुकीत मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनल एक हाती विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी झाल्याने चित्रपट क्षेत्रातील सदस्यांनी समर्थ पॅनलचे नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.

महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या 14 जागांवर समर्थ पॅनल सर्व जागा जिंकत दणदणीत विजयाची नोंद केली. मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या समर्थ पॅनलमध्ये सुनील महाजन , दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर ,सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे ,रवींद्र गावडे ,गणेश गारगोटे ,विकास तोरणे,या सर्व उमेदवारांचा समावेश होता.

या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत समर्थ पॅनल चा संपूर्ण पॅनल निवडून आणला. या निकालामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात पुढील पाच वर्षासाठी समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीकडे सूत्र जाणार असून महामंडळाच्या विकासासाठी आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
“मेघराज राजे भोसले म्हणाले,”निवडणुकीच्या काळात विरोधी पॅनल कडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले. मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून, गेल्या दहा वर्षात आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विषय आमच्या कार्याची पावती आहे. सभासदांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे त्यांच्यासाठी अधिक समर्पितपणे आणि जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. महामंडळाच्या सर्व सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पुढील काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध राहू.”
विजयानंतर समर्थ पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत सदस्यांचे आभार मानले. महामंडळाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्व समावेशक कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






